ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) शहरात ‘ इम्रती ‘ हा ऐतिहासिक पदार्थ चाखायला मिळतो.शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी परिसरातील उत्तम उपाहारगृहात ही वैशिष्ट्यपूर्ण जिलेबी सदृश्य इम्रती मिळते.या इम्रतीची परंपरा सुमारे १०३ वर्षाची आहे. उडीदडाळ,मैदा ,साखर, यांपासून ही गोड इम्रती बनविली जाते.तिची चवच इतकी लाजवाब आहे की लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच ही इम्रती खाण्याचा मोह आवरत नाही.औरंगाबादची खाद्यसंस्कृती चांगलीच विकसित आहे.शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या खाद्याची इथं रेलचेल आहे.शहागंज परिसरातील चिकन कटकी व बिर्याणीचे विविध प्रकार ही तर अस्सल खवय्यांसाठी पर्वणीच आहे.जिल्ह्यातील खुलताबाद इथं मैद्यापासून बनविलेला खाजा हा उत्तम पदार्थ मिळतो.
जालना जिल्ह्याची खासियत म्हणून घेवर या पदार्थांचे नाव घेता येईल.जिल्ह्यात मारवाडी समाजाची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे त्यांच्या कडून आलेला हा चवदार पदार्थ सर्वत्र आवडीने खाल्ला जातो.घेवर हा मैद्यापासून बनविला जातो.जालना येथील मथुरा भुवनाची बासुंदी आणि लस्सी आपल्या चवीमुळे चांगलीच लोकप्रिय ठरली आहे.गजाननची शाकाहारी थाळी देखील प्रसिद्ध आहे.जालना जिल्हा मोसंबीच्या उत्पादनासाठी राज्यात अग्रेसर आहे.त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मोसंबी रस मिळतो. परभणी म्हटलं की खवय्यांच्या जिभेला वेध लागतात ते सेलूच्या चण्यांचे अद्रक,लसूण, गरम मसाला लाल तिखट, हळद, तेलमीठ यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या या चण्याची किर्ती दूरवर पसरली आहे. दुधाच्या खव्यापासून बनवणारी कलम ही जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. पौष्टिक धपाटा ही बीडची खासियत विविध धान्यांचा वापर करून धपाटा बनविला जातो.
आष्टा मोड हे ठिकाण विशेष करून चिवड्यासाठी प्रसिद्ध आहे.पोटभर न्याहारीसाठी शिरूर ताजबंद हा पर्याय उत्तम आहे.वेळामवस्येला विविध प्रकारच्या भाज्यांची एकत्रित भाजी केली जाते. ( याला इथे भजी म्हणतात.) आणि त्यासोबत प्यायला असते.ती मस्त आंबिल भिजवलेल्या मुरमुऱ्याची फोडणी दिलेली ‘ सुशीला ‘ लातुरकरांमध्ये लोकप्रिय आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा हे ठिकाण प्रसिद्ध आहे.ते खिचडी करिता इथं तांदळापासून बनविली जाणारी उत्तम दर्जाची खिचडी मिळते.ती इतकी चवदार असते.की,आज सर्वत्र ‘ वारंगा खिचडी ‘ हा एक ब्रॅण्ड झाला आहे.अशी ही गरमागरम खिचडी,वरती दह्याची कढी आणि कुरकुरीत भजी….. हा बेत कायम स्मरणात राहणारा आहे.
उस्मानाबाद ( धाराशिव ) म्हटलं की चटकन डोळ्यासमोर उभा राहतो.तो कुथंलगिरीचा पेढा आपल्या अवीट गोडीने साऱ्याच लोकांना या पेढ्याने अशी काही मोहीनी केली आहे,की पेढा आणि कुंथलगिरी हे समीकरणच झाले आहे.