‘ आस्वाद ‘ महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा


खाद्यसंस्कृती बद्दल महाराष्ट्र नेहमीच पुढे राहीला आहे.सोमेश्वर राजाच्या ‘ मानसोल्लास ‘ या मध्ययुगीन संस्कृत ग्रंथात पदार्थांच्या अनेक कृती दिलेल्या आहेत. मराठी माणसाच्या जेवणातील आणि फराळाच्या पदार्थाबद्दल समर्थ रामदासांचे शिष्य श्री.नवाथे यांनी भोजन कुतूहल ‘ हा सुंदर ग्रंथ लिहिला आहे.चारशे वर्षांपूर्वीचा हा ग्रंथराज मराठी खाद्य अभिरूचीचा वस्तूपाठ आहे.’ गृहिणी मित्र ‘ या नावाचा मराठीतील जुना ग्रंथ काही वर्षांपूर्वी बाजारात मिळत‌ होता. सारस्वत महिला समाजाचे ‘ रसचंद्रिका ‘ हे १९४३ सालचे पुस्तक अजूनही ‘ हिट’ आहे.’ एक हजार पाकक्रिया ‘ हे पुस्तक लक्ष्मीबाई धुरंधर यांनी १०० वर्षांपूर्वी लिहीले.हे सांगूनही खरे वाटणार नाही.त्या काळात त्यांनी तंदुरी रोटी,नान,चिकन, हैद्राबादी बिर्याणी,मटणाचे विविध प्रकार यांची कृती दिली.तसेच जवळपास सर्व स्नॅक्स व व्हेजिटेरियन पदार्थांची कृती
दिली.त्यानंतर ५० वर्षांपूर्वी कमलाबाई ओगले यांनी ‘ रूचिरा ‘ नावाचे पुस्तक लिहून पाक साहित्यात मोलाचे योगदान दिले.हे मुद्दामपणे नमूद करावेसे वाटते
पूर्वी अन्नाच्या शुध्दतेवर खूप भर दिला जाई अन्नाला नावे ठेवू नयेत,अन्न प्रेमाने व शांत चित्ताने घ्यावे भूक असेल तेवढेच खावे अशी सोपी‌ ‘ अन्नसूत्रे ‘ आपल्या पूर्वजांनी प्रत्यक्षात आणली.
आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अतिथ्य शील आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती विज्ञानधिष्ठित
आहे.कोणता पदार्थ पानात कुठे वाढायचा याचेही नियम आहेत.ताटात मधोमध वाढलेला पदार्थ जास्त खाल्ला जातो.म्हणूनच वरणभात, पोळी,भाकरी,हे मुख्य पदार्थ ताटाच्या मध्यभागी वाढले जातात.बहुतेक
माणसं उजव्या हाताने जेवतात.आमटी,भाजी यासारखे
जास्त प्रमाणात पोटात जायला हवे म्हणून असे पदार्थ
उजव्या बाजूने वाढतात.चटण्यांमध्ये नारळ व दाणे असल्याने स्निग्ध पदार्थ जास्त म्हणून ते डाव्या बाजूला
असतात.या विज्ञाननिष्ठ खाद्यपरंपरेमुळे आपला आहार
समतोलच राहतो.
चव महाराष्ट्राची ……………


चांद्यापासून फांद्या पर्यंत महाराष्ट्रात चवीनं खाणाऱ्यांची लज्जतदार परंपरा आहे.जशी ही चवदार तशी ती आरोग्यवर्धक दर कोसांवर जिथे भाषा बदलते.तसा ताटातला मेनू सुध्दा.खान्देशात, विदर्भात, कोकणात आणि पुण्यात हाताची पाचही बोटं चाटून पुसून खायला लावणारे शेकडो खाद्यपदार्थ अस्तित्वात आहेत.सणाच्या दिवशी या पदार्थांचे महत्त्व लक्षात येते.
असं नाही तर त्या पदार्थाच्या ओढीने सणसुध्दा लक्षात राहतात.आपल्या सर्व पदार्थांची चव जशी जिभेचे चोचले पुरवते तसा त्या पदार्थाचा वावर ताटा ताटांतून
त्या त्या प्रदेशाचे सांस्कृतिक ऋणानुबंधही जोपासते.
प्रत्येक पदार्थाला महाराष्ट्रातील मातीचा सुगंधही आहे.
जेवा, कोकण आपलाच आसा ………..
निळंभोर आकाश…. निळाशार सागर…….
आणि हिरवीगार नारळाची,आंबा,फणसाची झाडे……
असं निसर्गरम्य वातावरण असलेल्या कोकणाची खाद्य
संस्कृती ही या नैसर्गिक साधनसंपत्तीवरच अवलंबून आहे.शाकाहारीबरोबरच मांसाहारी पदार्थांची रेलचेल कोकणातील खाद्यसंस्कृतीत दिसून येते.कोकणच्या या
बहारदार खाद्यसंस्कृती विषयी आपण माहीती करून घेणार आहोत.
गणेशचतुर्थीला तांदुळाच्या पीठाचे उकडीचे मोदक ही कोकणची खासियत!
निसर्गरम्य कोकणात उपलब्ध साधनसामुग्री
म्हणजे भात (तांदूळ),नारळ,आंबे,फणस,नाचणी,
काजूगर, यांपासून बनवलेल्या पदार्थांचीच तेथे रेलचेल
असते.
थोडा गूळ घातलेलं, नारळाचं दूध आणि तांदळाच्या पिठाचे घावन असा अप्रतिम मेनू केवळ कोकणात साजऱ्या होणाऱ्या सणांचही तसचं अतूट नातं आहे.’ होळी रे होळी शिमग्याची पोळी’ म्हणत
संपूर्ण घरांमध्ये पुराणाची पोळी बनविली जाते.पाडव्या
नंतर येणाऱ्या रामनवमीला गव्हाच्या जाड रव्याच दूध
खोबरं व गूळ घालून केलेला ‘खिचडा’ हा असाच एक
अप्रतिम पदार्थ, चैत्रगौरीला कैरीचे पन्ह, कच्च्या आंबा (कैरी) वापरून केलेली,वाटलेली ‘ आंबेडाळ’ यांचा आस्वाद घेणे.
उन्हाळ्यात थंडगार कोकम सरबत,आंबा वा करवंदाचं पन्ह स्वागताला असतंच पण खास बेत असतो तो काजूगराच्या उसळीचा ही ओल्या काजूगराची उसळ तीन-चार प्रकारे बनवण्याची पद्धत
कोकणात आहे.फणसाच्या कुयरीत( छोटा कोवळा फणस) काजूगर घालून केलेली भाजी तर एवढी फर्मास लागते की.हातोहात संपते.आंब्याच्या रसाच्या वड्या,साट्ये यासोबतच मे महिन्यात घमघमाट सुटतो.
तो फणसाच्या रसातल्या ‘ सांदण ‘ नावाच्या पदार्थांचा फणसाच्या रसात गूळ व तांदळाच्या रवा घालून उकडलेलं सांदण,नुसतं किंवा फोडणीच्या मिरची सोबत खाणं ही एक मस्त मेजवानीच असते.बरेचदा
ओले काजूगर घालून केलेली कटाची आमटी हा सुद्धा
सणासुदीला होणारा खास पदार्था सोबत असतो.
पावसाळ्यातल्या रानभाज्या हा एक कोकणचा अवीट असा मेवा आहे.पावसाळ्यात मिळणाऱ्या अळूच्या पानाच्या घडीच्या अळू वड्या हा आगळावेगळा पदार्थ कोकणात लोकप्रिय आहे. पावसाळ्यात मिळणारी आणि काहीशी मटणाप्रमाणं चव असणारी शाकाहारी अळंबी हा असाच एक दुर्मिळ
खाद्यपदार्थ त्याशिवाय घोळ,फोडशी,कोवळा,टाकळा,
भारंगी,अशा विविध रानभाज्या पावसाळ्यात मुबलक
उपलब्ध असतात.नारळीपौर्णिमेला खोबरं गूळ घालून केलेल्या नारळीभाताचा नैवेद्य देवाला देण्याची पध्दत
आहे.कृष्णजन्माष्टमीला थालीपीठ,उसळ,गोड खीर,
असा बेत घराघरांत शिजतो.पावसाळी थंड हवेत गरमागरम मटण आणि कोंबडी वडे ही मांसाहारी मंडळींची मेजवानी ‘ आकाडी ‘ या नावाने प्रसिद्ध आहे.
कोकणात ‘ सागोती वडे ‘ सुप्रसिद्ध आहेत.अर्थात काकडीचा अथवा कोहळ्याचा रस घालून केलेले गोड
वडे ( घारगे ) आणि सोबतीला तांदळाची दूध- बेदाणे
घालून केलेली खीर हा खास पदार्थ शाकाहारी मंडळींसाठी आणि सर्वांसाठी उपलब्ध असतोच.
भाजणीचे वडे,डाळीब्यांची म्हणजे सोललेल्या
कडव्यांची उसळ, सोलकढी,हे पदार्थ कोकणचे खास
वैशिष्ट्ये आहे.आमसुले, नारळाच्या दूधात घालून केलेली सोलकढी खरोखर ‘ सोल ‘ म्हणजे आत्मा थंड
करते.हळदीच्या पानात तांदळाची गोड पिठी थापून केलेले ‘ पातोळे ‘ हा असाच एक नाविन्यपूर्ण पदार्थ
तसेच तांदळाच्या रव्याची खांडवी,उडदाचे शेंगोळे हे ही
असेच अफलातून खाद्यपदार्थ तसेच नुसता मऊभात,
मेतकूट,पापड,हे एक न्याहारीसाठी असलेलं ‘परफेक्ट
काॅम्बिनेशन ‘ आहे.
* अस्सल कोकणी मेवा *
अस्सल हापूस आंबा, हापूस आंबावडी, आंबा मावा, आंबा पोळी,आमरस, आंबाजाम, आंबा मोदक आंबा स्वीट बार, हापूस मुरांबा,चुकाबा लोणचे,आंबोशी
उकाडांबा,आंबा लोणचे, आंबा रायते, याखेरीज आमरसाच्या माव्यापासून मॅंगो बासुंदी, आंबा बर्फी, मॅंगो आईस्क्रीम, मॅंगो इडली, आम्रखंड, मॅंगो शेक, मॅंगो
राईस, मॅंगो साॅफ्ट ड्रिंक्स व आंब्याची असंख्य उत्पादने
आहेत.
* पित्तनाशक कोकम *
पित्तनाशक कोकम सरबत हे कोकणचे आणखी
एक वैशिष्ट्य आहे.तसेच कोकणची चविष्ट सोलकढी,
कोकम चटका ही उत्पादने कोणत्याही हंगामात मिळते.
* काटेरी पण रसाळ फणस *
फणस हे कोकणातील महत्वाचे रसाळ फळं आहे.फणसापासून तळलेले चांदण, कोकण खजूर,
फणस स्वीट बार, फणसाची भाजी,इ.फणसाची अनेक उत्पादने खवय्यांच्या जिभेवरील चव दीर्घकाळ
रेंगाळत ठेवणारी अशी आहेत.
* जीवन स्वास्थ्य देणारा आवळा *
आयुर्वेदात अमृता म्हणून संबोधित केला गेलेला
आवळा कोकणात विपुल प्रमाणात असून आंबट,गोड तिखट,तुरट, आणि कडू अशा पंचरसांनीयुक्त असलेला
आवळा शरीरातील कफ,वात, पित्त या त्रिदोषाचा नाश
करण्यात शक्तीवर्धक असा आहे. आवळ्यापासून आवळा सिरप, आवळा मावा,आवळा पेढा,आवळा जाम,आवळा डायजेस्ट मोरावळा, आवळा लोणचे, आवळा, ज्यूस,आवळा सुपारी, आवळा चुर्ण,आवळा ठेचा अशी अनेक उत्पादने!
* कोकणाची काळी मैना *
कोकणच्या डोंगरात मिळणारी करवंदे ही कोकणची काळी मैना म्हणून प्रसिद्ध आहे.या रानमेव्या
पासून करवंद सिरप,करवंद वडी, करवंद स्वीट बार
करवंद पल्प,करवंद जाम, तसेच कोकण मनुका असे
विविध पदार्थ तयार केले जातात.
* काजूगर *
काजूपासून सुका काजूगर, काजू बर्फी,काजू
मोदक काजू वडी,तर काजूबोंडापासून काजू सिरप हे
पेय बनवले जाते.
* जांभूळ ज्यूस *
कोकणातील जांभळापासून जांभूळ ज्यूस व जांभूळ चूर्ण ही उत्पादने तयार केली जातात. मधुमेही
रूग्णांसाठी जांभूळ ज्यूस उपयुक्त असतो.
* पौष्टिक नाचणी *
नाचणी सत्त्व हा कोकणचा आणखी एक
वैशिष्ट्यपूर्ण मेवा नाचणी सत्त्व मातेच्या दुधापासून तान्ह्या बाळांसाठी उपयुक्त आणि पौष्टिक आहे.शिवाय
उष्णतेचा विकार टाळण्यासाठी, पचायला हलका असतो.
* इतर औषधी उत्पादने *
कोकणात कुळीथापासून कुळीथ पीठ बार, मिरची पासून फोडणी मिरची,सांडगी मिरची,कोकणी
ठेचा, लिंबापासून लिंबू सिरप,लिंबू 🍋 लोणचे,गोड लिंबू लोणचे, लिंबू चटणी, आल्यापासून सुंठ पावडर पाचक रस अशा कितीतरी प्रकारचा कोकणी मेवा कोकणातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीतून उत्पादीत केला जातो.
शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांची एक आगळीवेगळी संस्कृती या कोकणाला लाभही आहे.हे
दररोज डोंगरात उगवून समुद्रात गडप होणाऱ्या सूर्यनारायण इतकेच सत्य आहे.
* आग्रही खान्देश ! *
खान्देशी मंडळींना पाहुण्यांची भारी हौस आहे. इथे होळी,गुढीपाडवा,अक्षयतृतीया आणि दिवाळी सण सर्वच समाजात मोठ्या उत्साहाने साजरे
होतात. कानबाई सारखे धार्मिक वार्षिक उत्सव साजरे
केले जातात.पोळा हा सण तर सर्वच खान्देशी शेतकरी
बांधवांचा सण ह्या सर्वच सण उत्सवासाठी आणि एरवी
कोणीही पाहुणे आले तरी पुरणपोळी किंवा खापरा- वरची पोळी खीर,आंब्याचा रस हरबऱ्याच्या डाळीची रस्शी म्हणजे मसालेदार आमटी भात,नागलीचे पापड,
कुरडया, कांद्याची भजी असा भरगच्च बेत असतो.
मातीचे खापर चुलीवर ठेवतात.आणि त्यावर सारण भरलेली पोळी भाजतात.
कानबाईच्या उत्सवाच्या वेळी जी पुरणपोळी
होते.तिला रोट म्हणतात.तांदळाच्या खिरीला साखर,
शिजवलेल्या हरबऱ्यांना मनुका, डाळीच्या मुटकुळ्यास
नारळ,व शिजवलेल्या भाताला मोगरा म्हणतात.
पुडाच्या पाटोड्या ( सातपुडपण म्हणतात.)
फुणके,वडे हे खास चमचमीत पदार्थ,डाळीच्या पिठाची
उकड घेऊन त्याची पोळी लाटून त्यावर कांदा, लसूण,
खोबऱ्याचा मसाला,खसखस,एकत्र करून तयार करून पोळी लाटतात.चौकोनी कापतात.नंतर काळ्या
मसाल्याची आमटी करून त्यात वड्या सोडून भाकरी
सोबत खातात. हरभरा तुरीची डाळ एकत्र करून फुणके करतात.कधी कोरडे खातात.किंवा कढीसोबत
खातात.मूग,मठ,चवळीची डाळ भिजत घालून वाटायच
आणि उन्हात वडे झारायच्या झाऱ्याने झारणे ह्या वड्यांची चमचमीत भाजी केव्हाही करतात.नंदूरबार कडे अळूच्या वड्या म्हणजे पात्रा फार प्रसिद्ध आहे.
अनेक खेडेगावात मध्ये कळण्याची भाकरी खातात.ज्वारीआणि उडीद एकत्र दळलेले असते व त्याची भाकरी बनवतात ‌तिच्यासोबत मिरच्यांचा ठेचा खातात.जळगाव, भुसावळ,खिरोदा,या भागात बहुतांश लोक अनेकदा भाकरीबरोबर वांग्याची भाजी आणि झुणका खातात.भरलेली वांगी किंवा भरीताची वांगी करण्याचा खान्देशात प्रघात आहे.
खान्देशी खिचडी ज्याने खाल्ली आहे.त्यालाच
तिची सुंदर चव माहिती आहे.संध्याकाळच्या वेळी आपण खान्देशाच्या कोणत्याही गावात, कोणत्याही गल्लीत फेरफटका मारलात तर जवळजवळ ७५ टक्के
घरात तुरीच्या डाळीची मसाला घालून केलेली खिचडी,
कढी,पापड,लोणचे हा बेत आढळेल.
खान्देश हा सर्वांचा आहे.त्यामुळे येथे सर्व पदार्थ सर्वांचे असतात.गरीब, श्रीमंत कोणत्याही जाती
जमातीतील लोक दालबाटी उत्साहाने खातात.हा खास
बेत असतो.शेतात चुलीवर बट्टी,बाकी,भाजली जाते.ह्या
बाटीवर वरण आणि वाटीभर साजूक गावरान तूप घालून खातात.हातावर वा पाटावर केलेल्या शेवया व त्याची खीर अतिशय गोड केली जाते.
खान्देशी ठेचा,लोणची, मसालेदार पापड हे
परदेशी पाठवले जातात.मिरची लसूण घालून केलेला ठेचा अतिशय चवदार लागतो.तिखट शेव हा प्रकारही वैशिष्ट्य शेवची भाजी व भाकरी सोबत कांदा हा बेत ही
जणांकडे असतो.
* तांबडा – पांढरा रश्याची लज्जत न्यारी ! *
काही गावांना स्वतःचा एक गंध आणि रूप
असते.कोल्हापूरला या दोन्ही बरोबरच स्वतःची अशी एक खास ‘ चव ‘ ही आहे.कोल्हापूरच्या मराठमोळ्या रांगडेपणाची झणझणीत चव जीभेवर उतरवील्या –
खेरीज खवय्येगिरीला पूर्णत्व प्राप्त होणारच नाही.
कोल्हापुरी माणूस खाण्याच्या बाबतीत ऐसपैसच.रोजच जेवण साधं असलं तरी, चटणी मुळे प्रत्येक भाजीला व्यवस्थित तवंग आलेला असतो. भाज्यांमध्ये रोज वाटूनघाटून मसाले वापरले जात नाही
कांद्याचा यथेच्छ वापर ओल्या मसाल्यातही नारळा
ऐवजी सुकं खोबरंच वापरणार वाटणात तीळ खसखस भरपूर घातलं जातं.त्या तुलनेत अन्य खड्या मसाल्यांना
फार महत्त्व नसतंच उगाच कोथिंबीरी,खोबरं घालून सजवण्याचा नाजूकपणाही इथल्या जेवणाला मानवत
नाही
त्याचप्रमाणे इथली तिखटजाळ मिरची आणि
मधाळ गूळ अशा टोकाच्या चवीही प्रसिद्ध आहेत.
त्यामुळे कोल्हापुरी माणसं आपल्या मधाळ आग्रहानं
गळी उतरवतो की,त्याच्या डोळ्यांत त्याच्या आपुलकीने
आणि मिरचीच्या ठसक्यानं पाणी आल्याशिवाय राहत
नाही.
मुळात कोल्हापुरी म्हणजे तिखटजाळ,असा काही समज आहे.ती मात्र इथल्या जेवणावर अन्याय करणारा आहे.कारण इथल्या जेवणासाठी थेट मिरचीची पूड वापरण्याची पध्दत नाहीच.आजकाल कोल्हापुरी मसाला म्हणून चाखला जातोय.तोच इथे रोजच्या स्वयंपाकात वापरला जातो.त्याला मसाला न म्हणता, सर्रास चटणी म्हटलं जातं.ही चटणी बनवणं आणि ती बनवतांना येणारा भूक खवळायला लावणारा
वास,ही खास अनुभवण्याची गोष्ट आहे.कांदा,लसूण
आलं, कोथिंबीर,गरम मसाला आणि मिरचीची पूड विशिष्ट प्रमाणात एकत्र करून ही चटणी तयार केली
जाते.कोल्हापुरात जशा गल्लीत गल्लीत तालमी दिसतात.तसे मसाल्याचे डंग (मसाले बनवण्याची गिरणी ) आहेत.


कोल्हापुरी जेवण म्हटलं की,तांबडा रस्सा,
पांढरा रस्सा असणारचं पण सुकं हा प्रकारही असतो.
तो अनेकांना माहिती नसतो.मटणं आणलं.की,ते आलं-
लसूण हळद, कोंथिबीर घालून उकडून घ्यायचं.
उकडलेल्या मटणांपैकी निम्मं मटण हे कांदा,ओला मसाला परतून फारसं पाणी न घालता शिजवायचं.
त्याला सुक्कं म्हणतात.तर भरपूर तवंग आलेल्या रस्शाचे निम्मं मटण करायचं.त्याला तांबडा रस्सा म्हणतात.तर फक्त मटणाचा स्टाॅक वापरून पांढरा रस्सा बनवतात.खसखस आणि काजूची पेस्ट घालून
बनवल्याने त्याला पांढरा रंग येतो.महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा जुना शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून सर्व लोकांना माहित आहे.कोल्हापूरची लवंगी मिरची आणि तमाशा याकरिता विख्यात असलेला हा जिल्हा तांबडा रस्सा व पांढरा रस्सा यासाठीही प्रसिद्ध आहे.
इथली गंमत म्हणजे,तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक
वाटी घेऊन त्याबरोबर चिकन 🐔 किंवा मटण खायचे.
म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला,तर त्यात पांढरा
रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो.हा रस्सा बाकी रश्शांप्रमाणे किंवा ग्रेव्ही
प्रमाणे टिकाऊ नाही.तांबडा रस्सा तयार करतांना कोल्हापुरी चटणी वापरावी लागते.
* रस्सा मंडळ *
कोल्हापुरात अजून एक गंमत पाहायला मिळते.
ती म्हणजे कोल्हापुरातील रस्सा मंडळ, कोल्हापूर शहर
म्हणजे खवय्यांसाठी स्वर्ग, चमचमीत, चरचरीत, चविष्ट खायची आवड असणाऱ्यांसाठी कोल्हापूरसारखं दुसर
ठिकाण नाही.याच कोल्हापूरच्या खाद्य विश्वातील एक
अनोखं आणि जगावेगळं प्रकरण म्हणजे कोल्हापूरचं
‘ रस्सा मंडळ ‘
‘ रस्सा मंडळ ‘ ही जरूर कोल्हापूरची एक खाद्य संस्कृती आहे.पण इथल्या सामाजिक व्यवस्थेचे
प्रतिबिंबही या संस्कृतीत आहे.रस्सामंडळ ही सार्वजनिक रित्या जपली गेलेली संस्कृती आहे.यात
काय असते? साधारण एका गल्लीतले एका व्यवसायतले किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे
पण एकमेकांचे मित्र असणारे पंधरा- वीस जण आठवड्यातून एकदा शक्यतो बुधवारी एकत्र येतात.
पंधरा – वीस जणांना पुरेल एवढ्या मांसाहारासाठी
वर्गणी काढतात.ठरलेल्या ठिकाणी मटण, रस्सा सुक्के
तयार केले जाते.जेवणाचे ठिकाणही ठरलेले असते.
पंचगंगेचा घाट,रंकाळा तलाव,दुधाळी मैदान, त्र्यंबोली टेकडी, ब्रम्हपुरी पिकनिक पाॅईंट,पद्माराजे उद्यान,शाहू
उद्यान, नेहरू बालोद्यान यांपैकी ठरलेल्या ठिकाणी रात्री नऊपर्यंत सर्वांनी पोहचायचे असते.सोबत स्वतः चे
ताट- वाटी, भात, चपाती,आणायची असते.या जेवणासाठी ब्रेड आणायला मात्र मनाई असते.कारण
भाकरी चपातीच्या तुलनेत रश्यांमध्ये ब्रेड बुडवला तर
रस्सा आणि जेवणारी माणसे यांचे प्रमाण बिघडते.ब्रेड
मध्ये रस्सा लगेच संपतो.त्यामुळे ब्रेड घेऊन येणाऱ्यांना
या खाद्यसंस्कृतीत प्रवेश नाकारला जातो.
बदलत्या जमान्यातही इथली खाद्यसंस्कृती,
रस्सा मंडळ,खानावळ ,वडा पाव,मिसळ,भजी पाव,
राजाभाऊची भेळ यातच टिकून आहे.आणि म्हणूनच
कोल्हापूरची खाद्यसंस्कृती चमचमीत, चरचरीत, आणि
चवदार राहीली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top