प्राचीन शिक्षणप्रणाली

आपली भारतीय संस्कृती ज्याप्रमाणे प्राचीन आहे. तशीच आपली शिक्षणप्रणाली सुध्दा प्राचीन कालखंडापासून प्रचलित आहे.या काळात गुरूकुल शिक्षण पध्दती होती. इ.स.पूर्व १२०० पर्यंतचा कालखंड हा साधारण या शिक्षण प्रणालीचा होता.या कालखंडालाच ऋग्वेदकाल असेही म्हणतात. या कालखंडात शिक्षण सर्वांसाठी मुक्त म्हणजेच खुले होते.ब्राम्हण, क्षत्रिय,वैश्य,व शुद्र या चारही धर्मातील व्यक्तींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार होता.ऋग्वेदकालीन शिक्षण प्रणालीत शिक्षणाची ध्येये अत्यंत व्यापक होती. तत्कालीन शिक्षण केवळ पोटार्थी नव्हते.तसेच ते निव्वळ पुस्तकी नव्हते.व्यक्तीला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणे हे शिक्षणाचे ध्येय होते.विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास करणे सत्य,सेवा, नम्रता,शिस्त,संयम,कष्टाची सवय,
धर्मपालन वृत्ती इत्यादी गुणांचे संवर्धन करून विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक विकास साधणे हे शिक्षणाचे ध्येय मानले जाई . गुरूचे गुरूकुलातच वास्तव्य असे. गुरू हा ज्ञानी, चारित्र्यसंपन्न, निःपक्षपाती असावा.अशी अपेक्षा असे. शिष्याची ओळख त्याच्या गुरूवरून होई.शिष्याच्या चांगल्या वाईट वर्तनाची जबाबदारी गुरूवरच टाकली जाईल.
* उत्तर वैदिक काळातील शिक्षण *
हा कालखंड सुमारे इ.स.पूर्व १२०० ते इ.स.पूर्व ६०० पर्यंतचा मानला जातो.या काळात धार्मिक, राजकीय,व सामाजिक जीवनात मोठे बदल घडून आले. या काळात ब्राम्हणांचे महत्व वाढले. यज्ञ, धार्मिक विधींचे महत्व वाढले. वर्णव्यवस्था फार झाली.स्रियांचे स्थान व दर्जा घसरला.शिक्षण पद्धतीतही महत्वाचे बदल घडून आले.या काळात शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला.स्रियांच्या शिक्षणावर ही
अनेक निर्बंध घालण्यात आले. त्यानंतर गुरूकुल पध्दती जाऊन ‘ आश्रम पध्दती ‘ विकसित झाली. आश्रमात वेदशास्राबरोबरच नीतीशास्र, इतिहास, युद्धशास्त्र असे विविध विषय शिकवले जात असे आश्रमातील विद्यार्थी आपल्या वर्णाला अनुसरून शिक्षण घेत.या काळात स्री शिक्षणाचा मात्र उत्तरोत्तर संकोच होत गेला.
राजघराण्यातील स्त्रिया शिक्षण घेत.सामान्य स्त्रिया मात्र शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दिसतात.
* बौध्द कालीन शिक्षण प्रणाली *
प्राचीन भारतीय शिक्षण पध्दतीच्या विकासातील या कालखंडाला बौद्धकालीन शिक्षण पध्दतीचा कालखंड म्हणतात.हा साधारणतः गौतम बुद्धांच्या बौध्द धर्माच्या स्थापनेपासून ते सम्राट
हर्षवर्धनाच्या राजवटीपर्यत मानला जातो.हा कालखंड प्राचीन भारतीय शिक्षणात महत्वाचा मानला जातो.या काळात प्राथमिक शिक्षण बुध्द मठात दिले जाई. उच्च शिक्षणासाठी या कालखंडात तक्षशिला, नालंदा,
विक्रमशिला, इत्यादी मोठमोठी विद्यापीठे स्थापन झाली. विद्यापीठांची स्थापना ही प्राचीन भारतीय शिक्षणाच्या विकासातील सर्वात प्रगत टप्पा मानला जातो. या विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना
‘ द्वार परीक्षा ‘ नावाची अत्यंत कठीण परीक्षा द्यावी लागत असे. बौध्द संघातून सर्वांच्या संमतीने निवडलेल्या विद्वान व चारित्र्यसंपन्न अशा भिक्षू कडे विद्यापीठांची प्रशासकीय सूत्रे दिली जात.बौध्द विद्यापीठांतून बौध्द धर्माची शिकवण, तत्वज्ञान, भाषाशास्त्र,, शिल्पकला, संगीत, खगोलशास्त्र,व्याकरण तसेच इतर धर्माची शिकवण इत्यादी विषय शिकवले जात.हिंदू विद्यापीठात वेदविद्या,खगोल,संस्कृत व्याकरण, धर्मशास्त्र, कला यांचे शिक्षण दिले जाई. या विषयांव्यतिरिक्त हस्तकला,वास्तूकला, शिल्पकला, विज्ञान -तंत्रज्ञान , औषधोपचार
शल्यचिकित्सा यांचेही शिक्षण दिले जाई.या विद्यापीठांतून देश- विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत.या काळातील काही प्रवाशांच्या प्रवासवर्णनावरून असा संदर्भ मिळतो की,या विद्यापीठात जवळपास ४००० ते ५००० विद्यार्थी शिक्षण घेत असत.
* मध्ययुगीन कालखंड *
साधारणता इ.स.१२०० ते इंग्रज भारतात येण्यापूर्वीचा कालखंड हा मध्ययुगीन कालखंड
मानला जातो.या काळात शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात आकुंचन झालेले दिसते. ब्राम्हणांच्या वर्चस्वामुळे
सर्वसामान्यांना अज्ञानाच्या अंधारात खितपत पडावे लागले. मंत्र – तंत्र व जादूटोणा यांचे प्रस्थ वाढले.अनिष्ट चालीरिती,प्रथा, परंपरा,व कट्टर धार्मिक विधी,होमहवन यांचे प्रमाण वाढले.स्रियांच्या वरची बंधने जास्तच घट्ट झाली.त्यांना शिक्षणाची द्वारे पूर्णपणे बंद केली होती.सर्वसामान्यांचे जीवन अज्ञानामुळे अघोरी प्रथांचा आहारी गेले.हा कालखंड ‘ अंधकारमय कालखंड ‘ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.या काळात महाराष्ट्रात विविध थोर संत होऊन गेले.त्यांनी अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला जागृत करण्याचे कार्य केले.त्यांनी सर्वसामान्य जनतेला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे कार्य केले.त्यांच्यात एकजूट निर्माण केली.आणि प्रथा परंपरांच्या जोखडातून त्यांना मुक्त करण्याचे कार्य केले.विखुरलेल्या समाजाला संघटित करण्याचे कार्य केले.त्यांच्या या कार्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार झाले.
* ब्रिटीशकालीन शिक्षणप्रणाली *


सतराव्या शतकानंतर पोर्तुगीज,डच, फ्रेंच,राजसत्तांनी भारतात प्रवेश केला.याच राजसत्तांनी भारतात प्रवेश केला.याच राजसत्तांनी भारतात प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली.त्यांच्यानंतरइंग्रज भारतात आले आणि त्यांनी व्यापार करत पूर्ण भारत देश स्वतःच्या अंमलाखाली आणला.त्यांनी भारतीयांना पाश्चिमात्य धरतीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली.त्यांचे शिक्षण सर्वांसाठी खुले होते.त्यामुळे शिक्षणाचा प्रसार होण्यास मदत झाली.पाश्चिमात्य शिक्षणातून स्वातंत्र्य,समता, बंधुता,या मूल्यांची ओळख भारतीयांना झाली.धार्मिक शिक्षण मागे पडून धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा विकास झाला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करून समाज सुधारण्याचे कार्य केले.यातून नंतर राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होण्यास मदत झाली आणि स्वातंत्र्य चळवळ हळूहळू मूळ धरू लागली.इंग्रजांनी त्यांना कारकुनी कामात मदत होईल असे कारकून निर्माण करणाऱ्या शिक्षणावर भर दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top