
कला म्हणजे काय?
१) सौंदर्यांचा प्रतिसाद देण्यासाठी सर्जनशील कार्य
२) कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी
* कलेचे अनेक प्रकार आहेत *
जसे- चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, विणकाम,मुर्तीकारी इत्यादी.
* कलेची व्युत्पत्ती *
‘ कला ‘ हा शब्द ‘ कल् ‘ या धातूपासून झाला आहे.
भारतीय कलेचा उगम इ.स. पु.३००० पासून आपण बघू शकतो.आधुनिक कलेच्या प्रवासात त्यावर सांस्कृतिक ( उदा.सिंधू आणि ग्रीक ) तसेच धार्मिक प्रभाव जसे की,हिंदू,बुध्द,जैन, आणि मुस्लिम बघावयास मिळतो.
कोणत्याही राष्ट्राच्या विकासात संस्कृती महत्वाची भूमिका बजावते.हे सामायिक वृत्ती,मूल्ये, उद्दिष्टे आणि पध्दतींचा संच दर्शवते.संस्कृती आणि सर्जनशीलता जवळजवळ सर्व आर्थिक, सामाजिक, आणि इतर क्रिया कलापांमध्ये प्रकट होते.भारतासारख्या वैविध्यपूर्ण असलेला देश त्यांच्या संस्कृतीच्या बहुलतेचे प्रतीक आहे.
*चित्रकला *
भारतातील पारंपरिक चित्रकलेच्या ८ प्रकारांची माहिती पुढे घेणार आहोत.
१) मधुबनी चित्रकला किंवा मिथिला चित्रकला

ही चित्रकला हिंदू चित्रकलेची एक शैली आहे.जी नेपाळच्या मिथिला प्रदेशात आणि बिहारच्या भारतीय राज्यांमध्ये प्रचलित आहे.हे बिहारचे लोकचित्र आहे.मधुबनी जिल्ह्यातील जितवारपूर गाव हे मुख्य केंद्र आहे.
लोक चित्रकलेच्या या शैलीत रामायणातील दृश्ये आणि हिंदू देवी- देवतांच्या प्रतिमा कॅनव्हासवर रेखाटल्या जातात.मधुबनी चित्रे मुख्यतः रेषांचा उपयोग करून रंगवली जातात.महासुंदरी देवी या मधुबनी चित्रकलेच्या प्रसिद्ध कलाकार आहेत.
२) वारली आदिवासी चित्रकला

वारली ही महाराष्ट्रातील पारंपरिक आणि आदिवासी चित्रकला आहे.वारली चित्रकलेच्या सहभागी होणाऱ्या जमाती सह्याद्री पर्वतरांगेच्या उत्तरेकडील आहेत.तांदळाचा लेप आणि पाण्याच्या मिश्रणाने बनवलेले पांढरे रंगद्रव्य वापरून पेंटिंग तयार केली जाते आणि डिंक बाईंडर म्हणून वापरला जातो.
वारली ही बहुतकरून महाराष्ट्रात राहणारी आदिवासी जमात आहे.सह्याद्रीच्या रांगा, डहाणू,पालघर,
मोखाडा ,जव्हार,येथे वारली लोक राहताना दिसतात.ही अतिशय सुंदर दहाव्या शतकाच्या आधीपासून अस्तित्वात आहे.वारली लोकांची मातीशी घट्ट नाळ जोडली गेली आहे.त्यामुळे त्यांच्या चित्रांत त्यांचे दैनंदिन व्यवहार,नित्याची कामे तसेच शेतीची कामे,उत्सव यांचे चित्रण केले जाते.ही चित्रे शक्यतो तांदळाच्या ओल्या पीठाने विटकरी रंगाच्या भिंतीवर आणि अंगणात केले जाते.वारली समाजाच्या बायका शक्यतो ही चित्रे काढतात.
या चित्रांचे खास वैशिष्ट्ये असे की ही चित्रे गोल त्रिकोण, आणि तिरप्या रेषा यांच्या साहाय्याने काढली जातात.ही चित्रे फक्त या तीनच भौमितिक आकृत्या वापरून काढल्या तरी त्यांच्यात विविधता असते.आणि ही चित्रे अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण दिसतात.एकमेकांत हात गुंफलेल्या स्त्रियांचे चित्र तसेच शेतीची वेगवेगळी कामे आणि गुरे वगैरे यांचे सुंदर रेखाटन या चित्रांमध्ये दिसून येते.
३) कलमकारी चित्रकला

सुती कापडाच्या छपाईचा व रंगाईचा एक पारंपारिक भारतीय हस्तकला व्यवसाय सध्याच्या आंध्रप्रदेशातील मसुलीपटम् येथील कलमकारी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.’ कलम ‘ म्हणजे बारीक व मऊ तारांचा कुंचला त्याच्या साहाय्याने हे काम केले जाई . म्हणून ‘ कलमकारी ‘ ही संज्ञा रूढ झाली.
कलमकारीचे तीन प्रकार आढळतात- १) लाकडी ठशांची छपाई
२) लाकडी ठशांची छपाई पण कलमाने केलेली रंगाई
३) फक्त हाताने केलेली रंगाई
कलमकारी चित्रकला ही भारतात आंध्रप्रदेशात आणि तेलंगणा येथे उद्यास आली.या चित्रकलेचे दोन प्रकार आहेत. १) श्रीकलाहस्ती शैली २ ) मछलीपट्टन शैली
श्रीकलाहस्ती शैली ही एक अवघड प्रकारची चित्रशैली आहे.या शैलीत नेहमी पेनाचाच उपयोग केला जातो.हे काम मुक्तहस्त शैलीने केले जाते.मंदिराच्या गर्भगृहात आणि आतल्या इतर बाजूस या
शैलीचे नमुने दिसून येतात.
कलमकारी चित्रकला ही मूलतः पट्टचित्र या नावाने ओळखली जात होती.हिंदू पुराणकथा सांगणारे लोक गावोगावी फिरत असतं.लोकांना चित्रांच्या आधारे पुराणकथा सांगताना ह्या चित्रकलेचा उगम
आणि प्रसार झाला. कलमकारी चित्रकलेसाठी फक्त नैसर्गिक रंग वापरले जातात.वनस्पतींची मुळे,पाने, फुले आणि धातूंचे क्षार वापरले जातात.शेण आणि वनस्पतींच्या बिया यांचाही वापर होतो.
४) राजपूत चित्रकला

राजपूत चित्रकलेचा उगम १६ व्या किंवा १७ व्या शतकात झाला.उत्तर भारतातील राजपुतानाच्या शाही दरबारात विकसित झाली.
चित्रांतील रंग हे काही खनिजे,वनस्पतींचे स्रोत, आणि शंखशिंपल्या पासून काढले गेले होते.आणि मौल्यवान दगडांवर प्रक्रिया करूनही ते मिळवले गेले.सोने-चांदीचा वापर केला.इच्छित रंग तयार करणे ही एक लांबलचक प्रक्रिया होती.काही वेळा दोन आठवडे लागतात.पारंपारिकपणे बारीक ब्रश हे सर्वसामान्य प्रमाण होते.हे वापरले जाणारे ब्रश खूप सुंदर असतं.
प्रत्येक राजपुताना राज्याने रंगकाम आणि वेगळी पध्दत निर्माण केली,पण काही वैशिष्ट्य समान होती.राजपुत रंगकाम हे वेगवेगळ्या कला,महाकाव्यातील प्रसंग दर्शवतात जसे – रामायण, अल्बममध्ये ठेवण्यासारख्या सूक्ष्म हस्तलिखिताला राजपूत रंगकामात प्राधान्य होते.पण काही चित्रकला ह्या महालाच्या भिंतीवर, किल्ल्याच्या आतील दालनांवर व हवेलीवर करण्यात येत असे, यामध्ये मुख्यतः शेखावतांची हवेली
किल्ले आणि शेखावत राजपूतांद्वारे निर्मित महाल पण समाविष्ट होते.
५) गोंड चित्रकला
गोंड- हा शब्द द्रविड अभिव्यक्ती कोंडमधून आला आहे.ज्याचा अर्थ आहे.’ हिरवा पर्वत ‘ गोंड
लोकांचा इतिहास सुमारे १४०० वर्षांचा आहे.चित्रकला आणि इतर कला प्रकार आदिवासी लोकांमध्ये विशेषतः गोंड जमातींमध्ये लोकप्रिय आहेत.गोंड लोकांचा असा विश्वास आहे की चांगली प्रतिमा पाहिल्यास नशिब येते.आणि ते आपल्या भिंती आणि घराच्या मजल्यांना पारंपारिक गोंदण आणि सजावटीने सजवतात.
गोंड जमात ही मध्यप्रदेश,बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गोंड जमात आहे.या जमातीत उगम पावलेल्या चित्रकलेला गोंड चित्रकला असे म्हणतात.
चित्रे काढण्यासाठी माती,कोळसा, आणि पानांचा वापर केला जातो.चित्रे काढण्यासाठी लागणारे रंग,गडद, आणि उठावदार असतात.निसर्गातील सर्व घडामोडींचे बारीक चित्रण हे या चित्रकलेचे वैशिष्ट्ये आहे.प्राणी,पक्षी, झाडे, आणि त्यावरच्या रेषा ही गोंड चित्रकलेची खासियत मानली जाते.
६) काली घाट चित्रकला
कालीघाट चित्रकला ही बंगालची पारंपारिक चित्रकला शैली मानली जाते.चित्र दाखवून त्या चित्रावरची कथा लोकांना गाऊन दाखवण्याची ही पारंपारिक शैली आहे.या चित्रशैलीतून सामाजिक समतेचा प्रसारही करण्यात येतो.
कालीघाट चित्रे देवदेवतांविषयक आहेत.त्यांत शिव-पार्वती, नृसिंह,राधा-कृष्ण,ब्रम्ह,कृष्ण- बलराम, सरस्वती,राम-सीता,तसेच रामायण -महाभारतातील अन्य व्यक्ती इत्यादींची चित्रे आहेत.पौराणिक विषयांखेरीज वाघांनी झुंजणारे योगी व वामाचारी योगी असाही एक विषय त्यांत आहे.
१८ व्या शतकात बंगालमध्ये ग्रामीण चित्रकार, पौराणिक चित्रे काढून कापडाच्या गुंडाळीवर गावीत.( ‘ पाटुआ’ चित्रप्रकार ) व गावोगावी जाऊन कथाभाग गातांना त्यासोबत ही चित्रे दाखवीत.ह्या प्रकारांत परिवर्तन घडून त्यातून कालीघाट चित्रशैली उद्यास आली.
ही चित्रे कापडावर किंवा हाताने तयार केलेल्या कागदावर काढत.कागदावर गडद रंगांनी
वेगवेगळे चित्रे बनवले गेले.या चित्रांचा मागचा भाग गडद असतो ,कालीघाट चित्रकला ओडिसा मध्ये ही दिसून येते.दिव्याची काजळी आणि वनस्पती तसेच वेगवेगळ्या रंगांच्या खड्यापासून ही चित्रे रंगवली जातात.
७) तंजावर – चित्रकला / तंजौर चित्रकला
छोला राजघराण्यात या कलेचा उगम झाला.येथील मराठा राजांनी विजयनगरातील नायक
राजघराण्याने आणि तंजौरच्या राजू समूहाने या कलेला मान्यता मिळवून दिली.
तंजौरची चित्रे दोलायमान रंग आणि भडक अलंकार, विशेषतः सोन्याच्या फॉइलचा वापर करून देवतांच्या विलक्षण चित्रणासाठी ओळखली जातात.जरी या कलाकृतींमध्ये वर्षानुवर्षे विविध बदल झाले तरी ती आजही कलाप्रेमी मध्ये लोकप्रिय आहे.
इसवी सन सोळाशेच्या सुमारास विजयनगरच्या राजांनी तंजौर चित्रकलेच्या प्रकाराला प्रोत्साहन दिले.ही चित्रकला मराठा राजवट असतांना बहरास आली.हिंदू मंदिरातील चित्रे ही या काळात काढण्यात आली.सोन्याचा मुलामा ही या चित्रांची खासियत म्हणायला हरकत नाही.या चित्रांचे वैशिष्ट्ये असे की एक किंवा दोन देवता यांचे चित्र असते.आणि त्याभोवती चमकदार सोनेरी रंगाची नक्षी पसरलेली असते.
देवदेवतांच्या कपडे पण सोनेरी असतात.काचेचे मणी, मोती आणि रत्नांचा वापर करून ही चित्रे काढली गेलेली असतात.
ही चित्रे शक्यतो लाकडी पृष्ठभागावर काढली जातात.त्यांना स्थानिक भाषेत ‘ पलगाई पद्म ‘ म्हणतात.
८) मुघल चित्रकला
मुघल चित्रकला ही भारतीय,फारसी आणि इस्लामी या तीन शैलीचे अद्वितीय मिश्रण आहे.
अकबराच्या शासनकाळात ( १५५६- १६०५ ) भारतीय लघूचित्रकलेचे नवे युग सुरू झाले.फत्तेपूर सिक्री ही नवी राजधानी बनवल्यानंतर अकबराने या ठिकाणी भारतीय आणि फारसी कलाकारांना एकत्रित आणले.अकबराच्या दरबारी मीरसय्यद आली आणि अब्दुल समद हे दोन फारसी कलाकार होते.त्यांच्या देखरेखीखाली मुघल चित्रकलेला नवी पालवी फुटली आणि मुघल चित्रकला शैली खऱ्या अर्थाने जगासमोर आली.
राजा जहांगीरच्या काळात झेब्रा आणि शहामृग यांची चित्रे काढली गेली आहेत.ही चित्रे बहुत करून कागदावर काढली गेली आहेत.त्याशिवाय काही चित्रे भिंती आणि हस्तिदंतावर काढली गेली आहेत. ही चित्रे बहुत करून कागदावर काढली गेली आहेत.त्याशिवाय काही चित्रे भिंती आणि हस्तिदंतावर काढली गेली आहेत.सोनेरी आणि हलक्या गडद रंगाचा वापर जास्त करून केला आहे.चांदी आणि सोने या धातूंचा वापरही रंग देण्यासाठी केला गेला आहे.