शासन,शिक्षण आणि समाज

लाॅर्ड मेकाॅले पासून चालत आलेली आपली शिक्षणपद्धती ही घोका आणि ओका या तत्वावर चालते आपण शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढतो.आपल्या सर्वांना आयत्या उत्तराची सवय झाली आहे. आणि जी शिक्षण पध्दती ही उत्तरावर अवलंबून असते ती नवं काही शोधत नाही.
आपल्या देशाचा विचार केला तर शिक्षण पद्धतीमध्ये होऊ घातलेले आमूलाग्र बदल हे दुर्देवाने तंत्रज्ञानाशी जोडले जात आहेत.खरंतर हे बदल शिक्षण प्रक्रियेशी संबंधित असलेल्या मानव संसाधनांशी जोडले जायला हवेत या ‘ बदल ‘ प्रक्रियेत विद्यार्थी,शिक्षक, आणि इतर समाज यांची मानसिकता बदलण्याची तरतूद असायला हवी.आज विद्यार्थी वर्गात का बसत नाहीत? शिक्षकाला आपल्या विषयाचं सखोल ज्ञान का नसतं? उपग्रहाद्वारे देण्यात येणाऱ्या शिक्षणप्रणालीला म्हणावा तेवढा प्रतिसाद का मिळत नाही? असे प्रश्न खऱ्या विचारवंताला अस्वस्थ करतात.विद्यार्थी,शिक्षक आणि समाज या तिन्ही घटकांमध्ये परस्पर संबंध ज्ञानार्जनासाठी पोषक राहिले नसल्याने असे प्रश्न उद्भवतात.


आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे,शिक्षण व्यवसायाभिमुख असायला हवं हे जरी खरं असलं तरी या दृष्टीकोनाचा अतिरेक करू नये.शिक्षणाचा संबंध थेट नोकरीची किंवा पोटापाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या व्यवसायाशी जोडून आपण मोठी चूक करतो आहोत.केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण असा प्रचार यामधून होत असल्याने शिक्षण ही ज्ञानप्राप्तीची किंवा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया न राहता शिक्षण म्हणजे एक सोपस्कार झालेला आहे.शिक्षण हे भविष्यात उत्तम नोकरी मिळवण्याचं किंवा व्यवसाय करण्याचं एक साधन आहे. साध्य नव्हे हे ज्या समाजाने, ज्या देशाने हे तत्व स्वीकारले तोच समाज,तोच देश नवनिर्मिती करू शकला.हे सिध्द झाले आहे.


काळ बदलतो,तसे सर्वच क्षेत्रांत नवे प्रवाह अनुभवायला मिळतात. शिक्षणप्रणाली आखतांना विद्यार्थी हा चांगला नागरिक, विज्ञाननिष्ठ आणि अखंड ज्ञानलालसा असलेला असावा.अशी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवली जातात. ही उद्दिष्टे जरी समान असली तरी कालानुरूप शिक्षणप्रणालीमध्ये नवे प्रवाह येतात,काही बदल घडून येतात.
काही वर्षांतील शैक्षणिक इतिहासातून आपण शिकलो आहोत.शिक्षणाला अध्यात्माची साथसंगत
हवी हे अधोरेखित झाले आहे. केवळ विज्ञान शिक्षणामुळे ‘ वैज्ञानिक – अंधश्रध्दा ‘ वाढते.त्यामुळे माणूस भौतिक सुखाच्या व चैनीच्या मागे लागतो.तो सुखलोलुप बनतो.तो आपल्या गावापासून दूर शहरात किंवा अन्य देशांत स्थलांतरित होतो.त्याला आपल्याच देशातील पूर्वापार परंपरा, चालीरिती यांविषयी घृणा वाटू लागते.म्हणून विद्यार्थ्यांला त्यांच्या परिसराशी जोडून ठेवणाऱ्या सामाजिक बांधिलकीचे भाव जपणाऱ्या शिक्षणाची गरज आहे.
मनुष्याच्या शरीर,मन व बुद्धीचा विकास करणारी व आत्मविश्वास निर्माण करणारी शिक्षण- प्रणाली विकसित करण्याची गरज अनेक मनीषींनी, विद्वानांनी व्यक्त केली आहे.शिक्षण असे हवे ज्यामुळे व्यक्तींचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीच्या संस्कारांबरोबरच श्रमप्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे.शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्वास व आत्मगौरव निर्माण होणे आवश्यक आहे.या दृष्टीने शिक्षणाचे भारतीयीकरण झाले पाहिजे.शैक्षणिक नीती व तंत्रज्ञानात भारतीय ज्ञान-विज्ञान यांची उपलब्धता व प्रोत्साहन हवे.म्हणून भारतीय सांस्कृतिक वारशाचे अध्ययन पाठ्य चर्चेमध्ये समाविष्ट व्हावे.भारतीय समाजाच्या विकासाची व अन्नयनाची आस धरणाऱ्या शिक्षणाने भारतीय भाषांची कदर केली पाहिजे.
प्राथमिक शिक्षणास प्राधान्य देणे फार गरजेचे आहे.शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर एकीकडे स्वयंघोषित व काही वेळा शासन पुरस्कृत इंग्रजी शाळा व दुसरीकडे रोडावलेल्या स्थानिक माध्यमांतील सरकारी शाळा या दुपदरी शिक्षण पध्दती मुळे समाजात उत्पन्न होणारा वर्गभेद थांबविण्यासाठी समान-तत्वावर आधारित सुदृढ शिक्षण पध्दतीची आवश्यकता आहे.
नवनिर्मिती होऊच नये अशी उपजत व्यवस्था ब्रिटीश शिक्षणपद्धतीत होती.अजूनही बहुतांशी आपली तीच स्थिती आहे. पूर्व – प्राथमिक/ प्राथमिक शिक्षणाला कुणी वालीच नाही. ‘ कुणीही यावे व टपली मारून जावे ‘ या म्हणीप्रमाणे कुणीही यावे व नर्सरीचे वर्ग सुरू करावेत.अशी स्थिती आहे.आजचे नर्सरीचे शिक्षण म्हणजे काय? काही ठराविक खेळ खेळणे,चित्रांची पुस्तके छापणे, पठडीतील अर्थशून्य, संस्कारशून्य गाणी म्हणणे व डबा खाणे. त्यापुढील प्राथमिक – माध्यमिक शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचे ओझे महाविद्यालयीन शिक्षणातून एका बाजूने उच्चशिक्षितांचे प्रज्ञा-पलायन व दुसरीकडे निर्माण होणारा कर्तव्य-
शून्य नोकरशहा वर्ग इंजिनिअर, मेडिकल इ.क्षेत्रांतील सेवाभाव गायब होऊन केवळ अधिकाधिक पैसा मिळविण्याची ती साधने झाली आहेत.तोच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘ उपयोजित – विज्ञान ‘ ( ॲप्लाइड सायन्स) शाळांकडे लागलेली गर्दी व शुध्द विज्ञान ( प्युअर सायन्स ) कला, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र यांना आलेली अवकळा असे चित्र पाहण्यास मिळते.एकूण महाविद्यालयीन व विद्यापिठीय शिक्षणात नवनिर्मिती सृजनशीलता व संशोधन यांचा अभावच दृष्टीस पडतो.ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वात प्रथम भारताच्या वैज्ञानिक आणि सामाजिक प्रगती विषयीची अनभिज्ञता साशंकता दूर करून त्याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करण्याच्या दृष्टीने स्थळभेटी ,स्थळदर्शन यांची नितांत आवश्यकता आहे.प्राथमिक शिक्षणाचे संस्कार, साक्षरता भावनांची अभिव्यक्ती व परिसर – निरीक्षण हे उद्दिष्ट असले पाहिजे.तर माध्यमिक शिक्षणाद्वारे जीवनाला उपयोगी पडणाऱ्या विषयांचे शिक्षण, विचारांना चालना मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याची जशी ही अवस्था आहे.त्याप्रमाणे मूल्यशिक्षणाद्वारे सामाजिक कर्तव्यांची त्याला जाणीव करून देण्याचेही हेच योग्य वय आहे.त्यापुढील उच्च माध्यमिक शिक्षण हे व्यवसायाभिमुख असावे.विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे व सामाजिक समस्या संबंधी स्वतःचे चिंतन निर्माण करण्यास,या शिक्षणाने विद्यार्थ्यास सक्षम बनवावे.तर त्यानंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणाद्वारे संशोधन व नवनिर्मिती यांवर विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित व्हावे अशा प्रकारे योग ,उद्योग, प्रयोग,व सह्योग अशा चार सूत्रांमधून शिक्षणाची चढती कमान योजली पाहीजे.
१९९० च्या जागतिकीकरण, खाजगीकरण,व उदारीकरण धोरणामुळे गॅट करार, आंतरराष्ट्रीय, वित्तीय संस्था यांच्या धोरणामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे स्वरूप पालटले आहे.भारतातील शिक्षण एका प्रचंड संकटात सापडले आहे. प्रचंड महाग,शिक्षण, नफेखोरी, शिक्षणाचा व्यापार, शैक्षणिक विषमता अभिजनवाद, शिक्षणाची मर्यादित संधी,गुणवत्तेपेक्षा धनसत्तेला महत्त्व,शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण
शैक्षणिक स्वायत्तेवर आक्रमण इत्यादी समस्यांनी शिक्षणव्यवस्था ग्रस्त आहे.
याचा परिणाम म्हणून बहुजन समाज, स्त्रिया,मुली,अल्पसंख्य कष्टकरी वर्ग शिक्षणातून बाहेर फेकला जात आहे.सरकार जनतेला शिक्षण देण्यास तयार नाही.सरकारी शिक्षणव्यवस्था बंदच पाडून शिक्षणाच्या खाजगीकरणाला उत्तेजन देण्याची सरकारची भूमिका आहे.
फ्रान्स, जर्मनी,फिनलॅंड,कॅडीनेव्हीयन देश जे करू शकतात.ते भारतात का होऊ शकत नाही?
* दक्षिण आफ्रिकेतील एका विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर खालील संदेश चिंतनासाठी पोस्ट केला होता. *
” कोणत्याही राष्ट्राचा नाश करण्यासाठी अणुबाँब किंवा लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या वापराची गरज नाही.त्यासाठी फक्त शिक्षणाचा दर्जा खालावणे आणि विद्यार्थ्यांकडून परीक्षांमध्ये फसवणूकीला परवानगी देणे आवश्यक आहे.”
अशा डाॅक्टरच्या हातून रूग्ण मरतात.
अशा अभियंत्यांच्या हातून इमारती कोसळतात.
अशा अर्थतज्ज्ञ आणि लेखापाल यांच्या हाती पैसा गमावला जातो.
अशा धर्मगुरूंच्या हातून मानवता मरते.
अशा न्यायाधीशांच्या हातून न्याय गमावला जातो……………..
* शिक्षणाचे पतन हे राष्ट्राचे पतन आहे. ‌‌*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top